जळगाव समाचार | १७ जुलै २०२६
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवारी (दि. १७) चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन शिक्षण व आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शाळेतील स्वच्छता, अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या निपुण तासिकेची अंमलबजावणी त्यांनी तपासली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासक्रमातील धड्यांची उजळणी करून घेत त्यांच्या प्रतिसादाचे कौतुकही त्यांनी केले.
भेटीदरम्यान करिश्मा नायर यांनी शिक्षकांकडून अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषा व गणित विषयातील मूलभूत कौशल्यांचा विकास करण्यासाठी निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळांमधील कामकाजाची नियमित पाहणी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर त्यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची तपासणी केली. ग्रामीण नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत औषधांची कमतरता भासू देऊ नये, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

![]()





