जळगाव समाचार | १५ जुलै २०२६
नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा बुधवारी १८ वा दिवस पूर्ण झाला. दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांचे सुमारे साडेआठ किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आवश्यक असल्यास सक्तीने द्रव आहार देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
ही जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते व वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, वांगचूक यांनी उपोषण कायम ठेवल्यास पुढील दोन दिवसांत त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आवश्यक वैद्यकीय उपचार तसेच द्रव आहाराच्या माध्यमातून जीवनावश्यक पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजे देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की, वांगचूक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून त्यांचे निधन झाल्यास ती देशासाठी आणि जगासाठी अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी बाब ठरेल. मानवी जीवन वाचविण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
सरकारवर टीका करताना याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, सरकार वांगचूक यांच्याशी एखाद्या कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे किंवा देशद्रोह्यासारखी वागणूक देत असून त्यांच्या उपोषणाबाबत अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही.
लडाखचे रहिवासी असलेले शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वैद्यकीय माहितीनुसार त्यांचे सुमारे साडेआठ किलो वजन कमी झाले असून त्यांचा रक्तदाब १०९/७० पर्यंत घसरला आहे. त्यांच्या आंदोलनाला शिक्षणतज्ज्ञ, विविध विरोधी पक्षांचे नेते तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत सर्वपक्षीयांनी या आंदोलनामागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

![]()





