जळगाव समाचार | १७ मे २०२६
इंधनाच्या वाढत्या किंमती, वाहतूक खर्चातील वाढ तसेच पशुखाद्य, वीज, पॅकेजिंग आणि प्रक्रिया खर्चात झालेल्या वाढीमुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ‘विकास’ ब्रँडच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. सुधारित दर रविवारपासून लागू करण्यात आले असून, या निर्णयाचा परिणाम शहर व परिसरातील ग्राहकांसह चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागांतून दररोज मोठ्या प्रमाणावर दूध संकलित करून प्रक्रिया केल्यानंतर ते शहरातील विक्री केंद्रांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. जळगाव शहरात दररोज सुमारे ४५ हजार लिटर दुधाची विक्री होत असून, त्यामध्ये ‘गोल्ड’ दूध आणि म्हशीच्या दुधाला अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विक्रीमुळे वाहतूक आणि शीतसाखळी व्यवस्थापनाचा खर्च वाढल्याचे दूध संघाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
नवीन दरानुसार विकास गोल्ड दूध ७४ रुपयांवरून ७६ रुपये प्रतिलिटर, म्हशीचे दूध ६२ रुपयांवरून ६४ रुपये, तर गायीचे दूध ५६ रुपयांवरून ५८ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात दूध दरात करण्यात आलेली ही तिसरी वाढ असल्याचे समोर आले आहे. डिझेल-पेट्रोल दरवाढीमुळे ग्रामीण भागातून शहरात दूध वाहतुकीचा खर्च वाढला असून, दूध संकलन केंद्रांची देखभाल, शीतगृह व्यवस्था, पॅकेजिंग साहित्य, प्लास्टिक पिशव्या आणि वीज बिलांवरील खर्चातही वाढ झाल्याने उत्पादन खर्च आणि विक्री दरामध्ये तफावत निर्माण झाली होती.
दरम्यान, पशुखाद्याचे वाढलेले दर, चाऱ्याची कमतरता आणि जनावरांच्या संगोपनावरील खर्चामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला होता. त्यामुळे दूध खरेदी दर वाढविण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत होते. ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा आणि दूध पुरवठा सुरळीत राहावा, यासाठीच दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दूध दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता असून, चहा, कॉफी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
![]()






