तमिळनाडूत टीव्हीकेचे सरकार स्थापन; जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

 

जळगाव समाचार | १० मे २०२६

Joseph Vijay यांनी अखेर तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल टाकत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेचे सरकार अधिकृतपणे सत्तेवर आले आहे. चेन्नई येथील Jawaharlal Nehru Indoor Stadium येथे रविवारी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शपथविधी सोहळा पार पडला. राज्यभरातून मोठ्या संख्येने समर्थक या सोहळ्यासाठी चेन्नईत दाखल झाले होते.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर जोसेफ विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तमिळनाडूचे राज्यपाल R. N. Ravi यांच्याकडे सादर करून बहुमताचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आज सकाळी १० वाजता विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उपस्थित समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या शपथविधी सोहळ्यास देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच अभिनेत्री Trisha Krishnan यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

जोसेफ विजय यांच्यासह आणखी नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, आधव अर्जुना, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोट्टय्यान, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्थना यांचा समावेश आहे. नव्या सरकारकडून राज्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here