टॉवर चौकातील लॉजवर छापा; कुंटणखाना प्रकरणी मॅनेजर अटकेत, एक पीडितेची सुटका…

 

जळगाव समाचार | १० मे २०२६

जळगाव शहरातील अत्यंत वर्दळीच्या टॉवर चौक परिसरातील उपाध्ये लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक मानवी व्यापारावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने (AHTU) छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत लॉज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून एका २८ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच एका ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना उपाध्ये लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३५ वाजेच्या सुमारास AHTUच्या पथकाने बनावट ग्राहकामार्फत सापळा रचला. संबंधित ठिकाणी व्यवहार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर छापा टाकला. छाप्यात लॉजमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी लॉजचा मॅनेजर राजू मोतीराम जोशी (वय ४५, मूळ रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून उमाकांत बुधा महाजन (वय ३८, रा. भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान एका २८ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली असून तिला संरक्षणासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छाप्यात पोलिसांनी १० हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, बनावट ग्राहकाला देण्यात आलेली ५०० रुपयांची चिन्हांकित नोट, तीन मोबाईल हँडसेट तसेच आक्षेपार्ह साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पोलीस हवालदार अर्चना मधुकर भावसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here