जळगाव समाचार | ७ मे २०२६
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांनी मोबाईलपासून दूर राहून अभिनय, नाट्य व कलाक्षेत्रातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र आयोजित दहा दिवसीय बालनाट्य अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
कान्ह सभागृहात पार पडलेल्या या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिका व मूकनाट्यांना उपस्थित पालक व मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी तीन नाटिका आणि दोन मूकनाट्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याने प्रभावित झालेल्या अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉ. वैभव मावळे यांनी कार्यशाळेत सुमारे ६० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे कलागुण दडलेले असून पालकांनी मुलांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दि. २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेत अभिनय, अभिव्यक्ती, संवादफेक, देहबोली आणि रंगमंचावरील सादरीकरण याचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप कार्यक्रमाला शैक्षणिक संचालिका मृणालिनी फडणवीस, सुनील वानखेडे, सांस्कृतिक संचालक शशिकांत वडोदकर, शालेय विभाग प्रमुख अशोक राणे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम हेमंत पाटील तसेच डॉ. शमा सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शशिकांत वडोदकर यांनी लहान मुलांच्या भावविश्वाला दिशा देण्यासाठी नाट्यकला प्रभावी माध्यम ठरत असल्याचे सांगितले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारी विज्ञान नाट्य स्पर्धा यापुढे कान्ह ललित कला केंद्रामार्फत घेण्यात येईल, अशी घोषणा केली. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन केंद्राच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश माळी, धनश्री शिंपी, कादंबरी चौधरी, कृतिका कोरे, हिमानी पाटील, अम्रिता बोहरा, गोपाल मोरे, रोनक तडवी, मयूर तायडे, पवन निकम, अभय साळुंखे आणि सिद्धी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रसाद देसाई यांनी केले.

![]()




