जळगाव समाचार | ७ मे २०२६
जळगाव शहरातील केसी पार्क परिसरात कौटुंबिक वादातून पतीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसी पार्क, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी पत्नी मनीषा भरत पाटील (वय ५०) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत पाटील हे दीर्घकाळापासून मद्याच्या व्यसनाधीन होते. दारूच्या आहारी गेल्यानंतर त्यांनी राहते घर विकल्याचीही माहिती समोर आली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर ते पत्नी व मुलांना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी (दि. ५ मे) रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भरत पाटील हे दारूच्या नशेत घरी आले होते. त्यानंतर त्यांच्यात आणि पत्नी मनीषा पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात मनीषा पाटील यांनी दोरीच्या साहाय्याने पतीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना पलंगावरून खाली ओढण्यात आले. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन तसेच गळा आवळल्याने भरत पाटील यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांमुळे पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. चौकशीदरम्यान मनीषा पाटील यांनी सततच्या त्रासाला कंटाळून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

![]()




