जळगाव समाचार | ५ मे २०२६
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पद्मालय गणपती मंदिर येथे आज पहाटे भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पहाटे सुमारे चार वाजता अभिषेक, विधिवत पूजा व आरती करण्यात आली. या वेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती.
पद्मालय हे गणपतीचे प्राचीन आणि जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असल्याने संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून पूजा-अर्चा केली.
या वेळी पुजारी गणेश वैद्य आणि केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा संपन्न करून घेतली. पूजनानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचा इतिहास आणि सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यानंतर श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे त्यांचा शाल आणि गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
दरम्यान, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन भाविकांसाठी देवस्थानतर्फे मंडप, कुलर आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

![]()




