ब्रेकींग; भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे अपात्र; जात वैधता प्रमाणपत्र रद्द

 

जळगाव समाचार | ५ मे २०२६

भुसावळ येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर राज्य शासनाने त्यांना पदावरून अपात्र घोषित केले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश आज महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला या राखीव प्रवर्गासाठी होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार म्हणून गायत्री गौर-भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतःला अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्या निवडणुकीत त्यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई सावकारे यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत निवडणुकीनंतर आक्षेप घेण्यात आले आणि संबंधित तक्रारींची चौकशी सुरू झाली. जात पडताळणी समितीने सखोल तपासणी केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निष्कर्ष नोंदवला. या निष्कर्षाच्या आधारे शासनाने २३ एप्रिल रोजी त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून भूतलक्षी प्रभावाने त्यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.

या आदेशामुळे गायत्री गौर-भंगाळे यांना तात्काळ पद गमवावे लागले असून, भुसावळमधील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here