जळगाव | प्रतिनिधी
क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) चा बिगुल वाजला आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला शहरात निघालेल्या भव्य रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. खेळाडूंचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर क्रिकेटमय झाले होते.
दिग्गजांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ
काव्यरत्नावली चौक येथून या भव्य रॅलीला प्रारंभ झाला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले.
यावेळी व्यासपीठावर अतुल कोगटा (दाल परिवार), प्रणव कोठारी (एस. के. ट्रान्सलाईन), किरण बच्छाव (सातपुडा आटोमोबाईल), संदीप काबरा (सुहांस केमिकल्स), सीए महावीर जैन (एम. व्ही. जे. इंडस्ट्रियल), विमल जैन, खलील बनवट, अनिल कांकरिया, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आणि अॅड. सुरज जहांगीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
असा होता रॅलीचा मार्ग
सहा संघांचे मालक, प्रशिक्षक आणि खेळाडू आपापल्या संघांचे झेंडे घेऊन मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते. काव्यरत्नावली चौकातून निघालेली ही रॅली कलेक्टर बंगला, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक आणि चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौकात आली. रस्त्याच्या दुतर्फा जळगावकरांनी ही रॅली पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दिमाखदार जर्सी अनावरण
रॅलीच्या समारोपप्रसंगी सहाही संघांच्या अधिकृत ‘जर्सी’चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये खालील संघांचा समावेश आहे:
1. जळगाव कोगटा किंग
2. पाचोरा एसकेटी योद्धाज
3. जामनेर सातपुडा हिरोज
4. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
5. अमळनेर सुहांस जायंट्स
6. रावेर रॉयल्स
प्रत्येक संघाचे खेळाडू आपापल्या रंगाच्या टी-शर्टमध्ये सज्ज असल्याने स्पर्धेपूर्वीच मैदानाबाहेर एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळाली.
१८ ते २६ एप्रिल दरम्यान ‘कांताई’वर चकमक
जळगाव क्रिकेट लीगचा हा थरार १८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर (जैन स्पोर्ट्स अकॅडमी) च्या मैदानावर रंगणार आहे.आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा.. खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा.. या टॅगलाईनसह खेळाडूंनी दिलेल्या घोषणांनी वातावरणात जोश भरला.
यांनी घेतले परिश्रम
ही भव्य रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांसह रवींद्र धर्माधिकारी, समीर गुळवे, हितेंद्र पटेल, प्रशांत विरकर, वरुण देशपांडे, जगदीश चावला, मोहम्मद फजल, उदय सोनवणे, युवाशक्तीचे विराज कावडिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धेचे थोडक्यात तपशील:
आयोजक: जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
मुख्य प्रायोजक:रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स
सह-प्रायोजक: अलरीक इलेक्ट्रिकल्स
कालावधी: १८ ते २६ एप्रिल २०२६
स्थळ: कांताई नगर जैन ड्रिम स्पेसेस मेहरूण तलावाजवळ

![]()


