जळगाव समाचार | २ नोव्हेंबर २०२५
१९८३ च्या ऐतिहासिक विश्वविजयाची आठवण करून देणारा क्षण पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसाठी समीप आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आज आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. दशकानुदशक चालत आलेल्या आयसीसी विजेतेपदाच्या दुष्काळाला अखेरचा पूर्णविराम देण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
या विश्वचषकाच्या तेराव्या पर्वात नवा विश्वविजेता मिळणार हे निश्चित झाले असून, तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारतासमोर पहिल्यांदाच फायनल गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, देशातील कोट्यवधी क्रीडाप्रेमी भारतीय रणरागिणींनी इतिहास घडवावा, अशी अपेक्षा बाळगून आहेत.
उपांत्य लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर मात करत नवा आत्मविश्वास प्राप्त केला. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद १२७ धावांच्या अप्रतिम खेळीला हरमनप्रीतच्या लढाऊ ८९ धावांची साथ लाभली आणि भारताने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडविरुद्ध २०१७ च्या विश्वचषकात केवळ नऊ धावांनी झालेला पराभव, तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल सुवर्णलढतीत आणि २०२३ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची हार – या सर्व पराभवांचे ओझे भारतीय संघ आज उतरवण्याच्या तयारीत आहे.
भारताने उपांत्य सामन्यात जिगर दाखवली असली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाड्यांवर सुधारणा आवश्यक आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर आणि क्रांती गौड यांना लय मिळाली नाही, तर हरमनप्रीतने एक सोपा झेल सोडला. तरीही, या स्पर्धेत सर्वाधिक १७ बळी घेणारी दीप्ती शर्मा पुन्हा एकदा भारताच्या विजयाची प्रमुख किल्ली ठरू शकते.
दक्षिण आफ्रिकेचा प्रवासही तितकाच रोमहर्षक राहिला आहे. गुवाहाटीत इंग्लंडविरुद्ध अवघ्या ६९ धावांवर आणि इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९७ धावांवर गारद झाल्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत फायनलपर्यंत मजल मारली. अनुभवी मारिझान कॅप (२०४ धावा, १२ बळी), नादिन डी क्लर्क (१९० धावा, ८ बळी), ताझमिन ब्रिट्स (२१२ धावा) आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड (४७० धावा) यांचे योगदान त्यांच्या यशाचे मुख्य कारण ठरले आहे.
भारतीय महिला संघाला गेल्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये – २०१७, २०२२ आणि २०२५ मध्ये – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. आजच्या या अंतिम सामन्यात तो सर्व हिशेब चुकता करण्याची सुवर्णसंधी आहे. “लोहा गरम आहे, आता हातोडा मारायची वेळ आली आहे,” अशीच भावना आज संपूर्ण देशात उमटली आहे.

![]()




