प्रभाग १६ मध्ये दोन अपक्ष महिलांची प्रस्थापितांना कडवी टक्कर

जळगाव समाचार | ५ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ ब आणि १६ क मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण मिळताना दिसत आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना, केवळ जनसंपर्क, आत्मविश्वास आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन घेऊन मैदानात उतरलेल्या दोन अपक्ष महिला उमेदवारांनी प्रस्थापितांना थेट आव्हान उभे केले आहे.

प्रभाग क्र. १६ ब मधील अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे तसेच प्रभाग क्र. १६ क मधील अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात काल झाली. अयोध्या नगर येथील मनुदेवी मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन दोन्ही उमेदवारांनी विजयाची कामना करत परिसरात समर्थकांसह प्रचारफेरी काढली. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्स्फूर्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचारफेरीने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले.

विशेष बाब म्हणजे प्रभाग १६ ब मध्ये हर्षाली कोल्हे या थेट भाजपच्या महिला उमेदवारासमोर एकमेव अपक्ष म्हणून उभ्या आहेत. कोणत्याही मोठ्या पक्षाचा आधार नसतानाही, त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि जनतेशी असलेल्या थेट संवादावर मतदारांचा वाढता विश्वास दिसून येत आहे. स्वच्छ प्रतिमा, स्थानिक प्रश्नांची जाण आणि महिलांच्या प्रश्नांबाबतची ठाम भूमिका यामुळे त्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहेत.

त्याचप्रमाणे प्रभाग १६ क मधील इच्छा अत्तरदे यांनीही प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला संवाद आणि “कामाच्या जोरावर राजकारण” ही त्यांची भूमिका मतदारांना भावत असल्याचे चित्र आहे.

दोनही अपक्ष महिला उमेदवारांनी कोणताही राजकीय वारसा नसताना, केवळ लोकांच्या प्रश्नांवर आधारित लढत देत दिग्गजांनाही कडवे आव्हान उभे केल्याने प्रभाग क्रमांक १६ ब आणि क मध्ये निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महिलांच्या सशक्त सहभागाचे आणि नव्या नेतृत्वाच्या उदयाचे हे चित्र जळगावच्या राजकारणात नवे पर्व ठरेल, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here