जळगाव समाचार | २८ ऑक्टोबर २०२५
मालवणी बोलीभाषेला मराठी रंगभूमीवर स्वतंत्र स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे सोमवारी (दि. २८) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळली होती आणि दहिसर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) दहिसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गवाणकर यांच्या लेखन प्रवासात ‘वस्त्रहरण’ हे नाटक अत्यंत गाजले. या नाटकामुळे मालवणी बोलीला मराठी रंगभूमीवर अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी आपल्या लेखनातून कोकणातील बोली, संस्कृती आणि विनोदाचा रस प्रभावीपणे साकारला. नाटकाबरोबरच त्यांनी ‘जगर’ (१९९८) या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्याशिवाय ‘वात्रट मेळा’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ अशी २० हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत.
त्यांच्या लेखनामुळे प्रादेशिक भाषेतील नाटकांचा नवा युगप्रवेश झाला. मालवणी रंगभूमीची ओळख देशभर पसरवणाऱ्या या थोर नाटककाराला ‘मानाची संघटना’चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. गवाणकर यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीतील एक अनोखा आवाज कायमचा शांत झाला असून, रंगभूमीवर त्यांच्या योगदानाची नोंद कायम स्मरणात राहील.

![]()




