गिरणेत अवैध वाळू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची धाड… अधिकारी निलंबित; तहसीलदार राजपूत व प्रांताधिकारी गोसावी यांना कारणे दाखवा नोटीस…

जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२५

गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि साठ्यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी आणि कांताई बंधारा परिसरात प्रशासनाने धाड टाकून व्यापक प्रमाणातील वाळू साठा जप्त केला. गौण खनिज विभागाने पंचनामा केल्यानंतर एकूण जप्त साठा २३०० ब्रास असल्याची नोंद केली असून हा संपूर्ण साठा सध्या पोलिस बंदोबस्तात गिरणा काठावर ठेवण्यात आला आहे.

अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचा होणारा ऱ्हास, पर्यावरणाचा वाढता धोका आणि सातत्याने येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अवैध उपशाची माहिती मिळताच प्रशासनाने अचानक धाड घालत वाळू साठा ताब्यात घेतला. साठा विखुरलेल्या ठिकाणी असल्याने पंचनामा करण्यास वेळ लागला, मात्र जप्त केलेल्या वाळूचा लिलाव प्रशासनातर्फे लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या कारवाईनंतर प्रारंभी धानोरा येथील पोलिस पाटील, तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यावर तातडीची कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले. तसेच जळगावचे तहसीलदार शीतल राजपूत व प्रांतधिकारी विनय गोसावी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत अशाच आणखी कारवाया होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here