जळगाव समाचार डेस्क | २५ डिसेंबर २०२४
27-28 डिसेंबरदरम्यान राज्याच्या विविध भागांत गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील शेतकऱ्यांना हवामानाच्या या बदलांबद्दल दक्ष राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 27 डिसेंबरच्या दुपारपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक व दक्षिण मराठवाडा भागांमध्ये पाऊस सुरू होईल. शुक्रवार रात्री वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या मराठवाडा जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. या भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत, विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर व इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस कायम राहील. या सर्व भागांमध्ये तापमानात थोडी घट होईल. 29 डिसेंबरपासून राज्यातील बहुतांश भागांत हवामान स्थिर होईल आणि 30 डिसेंबरपासून थंडीमध्ये वाढ होईल.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांना वादळी पावसापासून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि झाडांखाली, मोकळ्या जागेत किंवा विद्युत तारांखाली आसरा न घेण्याचे आवाहन केले आहे.