जळगाव समाचार | २७ मार्च २०२५
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे अधिवेशन निरर्थक आणि अपयश लपवणारे होते, असे त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकारने 100 दिवसांत मोठे बदल करण्याचे आश्वासन दिले होते, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. हमीभाव मिळत नाहीत. हे अधिवेशन केवळ हताशा आणि निराशा दाखवणारे ठरले.”
अधिवेशन काळात सत्ताधाऱ्यांचा माज स्पष्ट दिसून आला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच सभापतीवर अविश्वास ठराव आणावा लागला. विरोधी पक्षाला दडपण्याचा प्रयत्न केला गेला. वारेमाप घोषणा करून जनतेला फसवलं जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपच्या ‘सौगात ए मोदी’ या मुस्लिम भेटीच्या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. “मुस्लिमांनी मते दिली की सत्ता जिहाद म्हणायचं आणि निवडणुका आल्यावर त्यांनाच सौगात द्यायची, हा ढोंगीपणा आहे,” असे ते म्हणाले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करण्यापेक्षा आधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपने आता हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं.”

![]()




