जळगाव समाचार | २४ मे २०२५
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मलकापूर येथील प्रवासी आरक्षण केंद्रावर मोठी कारवाई करत दोन तिकीट दलालांना अटक केली आहे. या कारवाईत १० लाख रुपयांहून अधिक किमतीची १८२ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
दक्षता पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर येथील पीआरएस कार्यालयावर छापा टाकला. यावेळी ३,९६० रुपयांचे तत्काळ वातानुकूलित तिकिट बुक करताना दोन व्यक्तींना पकडण्यात आले. त्यांची नावे संजय चांडक आणि त्याचा १७ वर्षीय सहाय्यक प्रसाद काळे अशी आहेत.
चौकशीत संजय चांडकने मुंबईतील एका कुख्यात दलाल ‘ठाकूर’शी संबंध असल्याचे कबूल केले. त्याने पीआरएस मलकापूरवरून बुक केलेल्या १८२ तिकिटांचे फोटो व्हॉट्सॲपवरून ठाकूरला पाठवले होते. या तिकिटांची एकूण किंमत १०,०९,८३३ रुपये होती. ही तिकिटे बेकायदेशीररित्या पुनर्विक्रीसाठी वापरण्यात येणार होती.
दक्षता पथकाने दोघांना अटक करून रेल्वे संरक्षण दलाच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान २३ लाइव्ह तिकिटे तत्काळ ब्लॉक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

![]()




