जळगाव समाचार डेस्क | ११ ऑक्टोबर २०२४
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे मार्गदर्शक रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांच्या सावत्र बंधू नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टच्या बोर्डाने एकमताने नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, हा प्रश्न ऐरणीवर आला होता, ज्याचे उत्तर आता मिळाले आहे.
रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टने शुक्रवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती, ज्यात नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांच्या कार्यशैलीतून रतन टाटा यांच्यापेक्षा वेगळेपण दिसून येते, कारण त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते.
टाटा समूहातील सर्वच कंपन्यांचा मालकी हक्क टाटा सन्सकडे आहे. या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 60 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. त्यामुळे नोएल टाटा यांची निवड टाटा ट्रस्टच्या भविष्यातील कामगिरीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते.
रतन टाटा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी सुप्रीम कोर्टात एका सुनावणीत स्पष्टपणे मत मांडले होते. त्यांनी म्हटले होते की, “सध्या मी या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पण भविष्यात दुसरी एखादी व्यक्ती माझ्या जागी असेल. त्याचे नाव टाटा हेच असावे हे गरजेचे नाही. एका व्यक्तीचे आयुष्य फार मर्यादित असते. पण संघटना नेहमीच कार्यरत असते.” या विधानातून रतन टाटा यांचा दूरदृष्टीने विचार करण्याचा दृष्टिकोन दिसून येतो.
रतन टाटा यांनी आपल्या ‘टाटायन’ नामक पुस्तकातून देखील आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी मत व्यक्त केले होते. त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला द्रष्टा आणि भविष्यवेधी गुण असावेत असे वाटत होते. तसेच, त्या व्यक्तीला अहंकार नसावा, कारण मोठ्या व्यवसायाच्या नेतृत्वामुळे अहंकार वाढू शकतो. त्यामुळे, रतन टाटा यांना केवळ उत्तराधिकारी नेमायचा म्हणून नेमण्यात रस नव्हता, तर त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वक्षमता तपासूनच निर्णय घेण्याचा त्यांचा विचार होता.
2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा केली होती, ज्यात एकच व्यक्ती टाटा ट्रस्ट व टाटा सन्सच्या अध्यक्षपदांवर राहणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.