जळगाव समाचार | २५ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरालगतच्या तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध कारवायांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने वाघनगर परिसरातील अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शहरालगतच्या या भागात इतका मोठा अवैध व्यवसाय सुरू असताना तालुका पोलिसांना त्याची माहिती नव्हती, हे निश्चितच धक्कादायक आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच तालुका पोलीस ठाणे हद्दीत अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड केला होता. आता वाघनगरातील हा वेश्या व्यवसाय उघड झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाली आहे. सलग दोन गंभीर अवैध धंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून उघड होणे, हे तालुका पोलिसांचे दुर्लक्ष की संगनमत, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच गुन्हे फोफावत असणे हे प्रशासनाच्या ढिलाईचे स्पष्ट द्योतक ठरत आहे.
वाघनगरातील या कारवाईदरम्यान तीन महिलांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आले होते का, याचा तपास अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या महिला कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की या कारवायांमागे स्थानिक पातळीवरील संगनमत, हप्तेखोरी किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष लपलेले असावे. पोलिसांच्या नजरेसमोर अशा गुन्हेगारी हालचाली चालू राहणे म्हणजे स्थानिक यंत्रणेचा संपूर्ण अपयशाचा नमुना आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी रामानंदनगरात झालेल्या गोळीबारानंतर तिथेही अशाच स्वरूपाचा वेश्या व्यवसाय उघडकीस आला होता. आता वाघनगरातील घटना त्याची पुनरावृत्ती ठरत असून, जळगाव शहरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे फोफावत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे केवळ कारवाई करून थांबणे नव्हे, तर स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेची आणि त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

![]()




