जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२६
जळगाव जिल्ह्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र भावना व्यक्त करत सोमवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आपल्या लाडक्या शिक्षिकेची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पालकांसह जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. “आमच्या मॅडमची बदली रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही,” असा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी एका लहान विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे घातलेले भावनिक साकडे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
उज्ज्वला सावकारे यांनी पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा दर्जा उंचावला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्या वाढली असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र, प्रशासकीय नियमांनुसार झालेल्या त्यांच्या बदलीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दरम्यान, आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत सावकारे मॅडमची बदली रद्द न झाल्यास गावात शाळा भरू देणार नाही, तसेच गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरवण्याचा इशारा दिला. विद्यार्थ्यांचे अश्रू आणि पालकांचा आक्रमक पवित्रा पाहता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आंदोलकांशी चर्चा करत शासकीय नियमांच्या चौकटीत राहून या प्रकरणात योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी लेखी आदेश मिळेपर्यंत पालकांनी आपली भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

![]()



