जळगाव समाचार | २७ मार्च २०२५
यावल तालुक्यातील किनगाव येथे २६ रोजी सकाळी एस.टी. बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६५ वर्षीय अशोक यशवंत सपकाळे (रा. किनगाव खुर्द) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अशोक सपकाळे हे दुचाकीवरून शेताकडे जात असताना शेतकी महाविद्यालयासमोर समोरून येणाऱ्या एस.टी. बसची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगावच्या शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अशोक सपकाळे हे बँकेतून निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
या अपघाताची नोंद यावल पोलीस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे किनगाव आणि परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी रस्ते सुरक्षेसाठी अधिक उपाययोजनांची मागणी केली आहे.

![]()




