जळगाव समाचार | ८ मे २०२६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार असून दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना तो ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी ते मार्च २०२६ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्यभरातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर पार पडली. राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
यंदाच्या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी तसेच १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल आठ दिवस आधी जाहीर होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यामध्ये निकालासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल https://results.digilocker.gov.in, https://www.mahresult.nic.in, https://sscresult.mkcl.org तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सीट क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार असून त्यानंतर निकाल स्क्रीनवर पाहता येईल.

![]()




