जळगाव समाचार | २६ सप्टेंबर २०२५
प्रसिद्ध शिक्षण सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांनी आज अटक केली आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांच्यावर आंदोलनादरम्यान उत्तेजक विधानं करून लोकांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये झालेल्या आंदोलनात मोठा गोंधळ उसळला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने लेहमध्ये इंटरनेट सेवा खंडित केली असून ब्रॉडबँडचा वेगही मर्यादित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने वांगचुक यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे. मात्र, वांगचुक यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या मागण्यांसाठी उपोषणावर बसले होते. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.