पोलीस अधीक्षक कार्यालयात १०० किलोवॉट सोलर प्लांट कार्यान्वित

 

जळगाव समाचार | १९ डिसेंबर २०२५

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे Sunstroat Green Technology Pvt. Ltd. या कंपनीचा १०० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक (जळगाव भाग), स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्हा विशेष शाखा अशा विविध संगणकीकृत कार्यालयांचा समावेश आहे. या सर्व कार्यालयांमध्ये दरमहा सुमारे १० ते ११ हजार युनिट्स वीज खर्च होत असते. वीज खर्चात बचत व्हावी, तसेच पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्याच्या उद्देशाने हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावरील सुमारे ४ ते ५ हजार स्क्वेअर फूट जागेत १८४ सोलर प्लेट्स बसवण्यात आल्या असून, या प्रकल्पातून दररोज किमान ३०० युनिट्स, तर उन्हाळ्यात ४०० ते ४५० युनिट्स वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे कार्यालयाचा वीज बिल खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून, अतिरिक्त वीजही उपलब्ध होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे (जळगाव भाग), पोलीस निरीक्षक सतीश गोराडे (जिल्हा विशेष शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, जळगाव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here