जळगाव समाचार | २३ नोव्हेंबर २०२५
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत होणार होता. मात्र समारंभाच्या अगोदरच स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने आनंदावर विरजण पडले. श्रीनिवास मानधना यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परिणामी, दुपारी चार वाजता होणारा मुख्य विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी दिली.
मानधना कुटुंबीयांनी सांगितले की, वडिलांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत कोणताही विवाह कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पलाश मुच्छल आणि दोन्ही कुटुंबांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने हा निर्णय घेतला. चाहत्यांनी आणि माध्यमांनी कोणत्याही अफवा न पसरवता स्मृतीच्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडू दोन दिवसांपासून सांगलीत दाखल झाले होते आणि समारंभाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे नाते 2019 पासून सुरू असून 2024 मध्ये दोघांनी ते अधिकृतपणे जाहीर केले. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये रोमँटिक पद्धतीने स्मृतीला प्रपोज केले होते. अलीकडेच दोघांच्या ‘तेनू लेके मैं जावांगा’ या गाण्यावरच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या आनंददायी क्षणी आलेल्या अडथळ्यामुळे सर्वांचे लक्ष आता श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे लागले आहे.

![]()




