जळगाव समाचार | १३ ऑक्टोबर २०२५
शहरातील स्मशानभूमीतून पुन्हा एकदा अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात मेहरूण परिसरात मृत महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता, तर सोमवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीतही अशाच स्वरूपाची घटना घडल्याने शहरभरात खळबळ उडाली आहे. सोन्याच्या लालसेपोटी चोरट्यांची मजल आता मृतांच्या अस्थींपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला आहे.
गायत्रीनगरातील छबाबाई काशिनाथ पाटील (वय ७४) यांचे पाच ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार अंगावरील सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने न काढता अंत्यसंस्कार केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता, डोके, हात आणि पायाच्या अस्थी गायब असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर कुटुंबियांनी “सोने नको, पण आईच्या अस्थी परत मिळाव्यात” अशी भावनिक मागणी केली होती. परंतु, पोलिस तपास असूनही या अस्थी चोरणाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
अश्याच प्रकाराची पुनरावृत्ती सोमवारी शिवाजीनगर स्मशानभूमीत झाली. खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. जिजाबाईंच्या अंत्यसंस्कारस्थळी डोके आणि पायाच्या भागातील अस्थी गायब होत्या, तसेच अंगावरील सुमारे चार ग्रॅम सोन्याचे दागिने देखील लंपास झाले होते. विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरीनंतर त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचे पान ठेवलेले आढळले, त्यामुळे अंधश्रद्धेच्या उद्देशाने ही चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मेहरूण आणि शिवाजीनगर स्मशानभूमीतील या सलग दोन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पहिल्या घटनेनंतर नागरिकांनी स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नेमण्याची आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती, परंतु महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आता या पुनरावृत्तीमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, मृतांचेही अस्थी सुरक्षित नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.