जळगाव समाचार | २२ डिसेंबर २०२५
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असून, या निकालांमधून राज्यातील नागरी भागांमध्येही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिंदेंवर सातत्याने टीका करणाऱ्या उबाठा गटाला जनतेने योग्य जागा दाखवली असल्याची टीका केली.
या निवडणुकांमध्ये शिवसेनेने आजवरच्या निवडणुकांमधील सर्वात मोठे यश मिळवले असून, सध्या ५५ नगराध्यक्ष शिवसेनेचे विजयी झाले आहेत. पुढील दोन दिवसांत हा आकडा ७० ते ७२ पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, शिवसेनेचे ८७५ नगरसेवक निवडून आले असून, महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेच्या पदरात मोठे यश टाकले आहे. जरी काही ठिकाणी निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्यात आल्या असल्या, तरी मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याबद्दल नागरी भागांतील मतदारांचे त्यांनी आभार मानले.
उबाठा गट २८८ ठिकाणी निवडणूक लढवूनही केवळ ७ ते ८ ठिकाणीच निसटता विजय मिळवू शकला, असे सांगत मंत्री सामंत यांनी त्यांच्या कामगिरीवर टीका केली. मुख्यमंत्री असताना नगर परिषदांसाठी केलेली कामे तसेच ‘लाडक्या बहिणींची योजना’ यामुळे एकनाथ शिंदे जनतेत लोकप्रिय ठरल्याचे त्यांनी नमूद केले. आजचे निकाल हे येणाऱ्या महापालिका निवडणुकांची नांदी असून, राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

![]()




