जळगाव समाचार डेस्क | ६ सप्टेंबर २०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवारी रात्री दोन मुलांमधील वादाचं रूपांतर मोठ्या दंगलीत झालं. पाचोरा रोडवरील व्यायामशाळेतून सुरू झालेल्या या वादाने इस्लामपुरा आणि कोळीवाडा गटांमध्ये रात्री दहा वाजता जोरदार दगडफेक सुरू केली. परिणामी, परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्यापूर्वी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी शेंदुर्णीत ठाण मांडून आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ४५ ते ४६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत पोलिस कर्मचारी गुलाब पोपट पवार (वय ४३) जखमी झाले असून, पोलिस वाहनांवरही दगडफेक झाली आहे. याशिवाय, तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
पाचोरा रोडवरील व्यायामशाळेत दोन मुलांमधील साध्या वादाने दोन गटांमध्ये मोठा संघर्ष निर्माण केला. इस्लामपुरा आणि कोळीवाडा गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन्ही बाजूचे अनेक लोक जखमी झाले. तसंच, वाहनांचेही मोठं नुकसान झालं. रात्रीच्या घटनेनंतर पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून, १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या अटकेनंतर संबंधितांच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी चौकशी करून अटक प्रक्रिया पार पाडण्याचं आश्वासन दिलं. रात्री उशिरा अटकेची कारवाई पूर्ण झाली. सकाळी कोळीवाडा आणि इस्लामपुरा परिसरातील शेकडो महिलांनी आणि पुरुषांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेत आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली. तसेच, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत घातली, त्यानंतर मोर्चे माघारी फिरले.
सध्या शेंदुर्णीत तणावपूर्ण शांतता असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

![]()




