ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

 

जळगाव समाचार | २० डिसेंबर २०२५

राज्याच्या राजकारणातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन झाले. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

शालिनीताई पाटील या एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या आमदार आणि मंत्री म्हणून कार्यरत राहिल्या असून ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महाराष्ट्राच्या महसूलमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली होती. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख “महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण” असा केला होता. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान मान देत सदैव पाठिंबा दिला होता.

शालिनीताई आणि वसंतदादा पाटील यांचे वैवाहिक आयुष्यही चर्चेत राहिले. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. शालिनीताईंचे पहिले पती हे विद्वान न्यायाधीश होते; मात्र अल्पावधीतच त्यांचे निधन झाले आणि शालिनीताई तरुण वयात विधवा झाल्या. पुढे त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली आणि मुंबई मंत्रालयात नोकरी मिळवली. याच काळात त्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वैयक्तिक सहाय्यक (पीए) झाल्या. वसंतदादांच्या पहिल्या पत्नी आजारी असल्याने पुढे दोघांचा विवाह मुंबईत अत्यंत साधेपणाने पार पडला. या विवाहावर टीकाही झाली; मात्र दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक जीवनात कार्य सुरू ठेवले.

शालिनीताई पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निर्भीड भूमिका, प्रशासनाचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी यामुळे शालिनीताई पाटील यांचे योगदान महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here