जळगाव समाचार डेस्क | १९ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित नाट्यप्रयोग सध्या रंगभूमीवर येण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे एकपात्री नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे नाटक एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय प्रवासावर आधारित असणार आहे. या नाटकाद्वारे शिंदे नेमकं काय सांगणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ या नाटकाची लेखनकथा डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेली असून, ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते अशोक समेळ यांचे चिरंजीव, अभिनेता संग्राम समेळ हा दीर्घांक सादर करणार आहेत. या नाटकाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी पाठवले गेले असल्याचे समजते. समेळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या नाटकाचे अधिक तपशील लवकरच जाहीर केले जातील, असे स्पष्ट केले आहे.
राजकारणावर आधारित आणखी एक नवं नाटक ‘50 खोके एकदम ओके’ सुद्धा लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचा विषय याच शीर्षकावरून स्पष्ट होतो. लोकनाट्य प्रकारातील हे नाटक दीपक गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार असून, ‘विच्छा माझी पुरी करा’ सारख्या गाजलेल्या लोकनाट्याच्या तोडीचं नवं नाटक रसिकांना पाहायला मिळेल, असा विश्वास गोडबोले यांनी व्यक्त केला आहे. ‘50 खोके एकदम ओके’ या नाटकाच्या पोस्टरने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरवर, “काय ते रस्ते.. काय ते खड्डे.. तरी पण म्हणायचं.. एकदम ओके,” अशी उपहासात्मक टिप्पणी करण्यात आली आहे.
या नाटकांपूर्वी ‘धर्मवीर’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला होता. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे प्रदर्शन 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित भूमिकेचे महत्त्व या चित्रपटात आहे. मात्र, ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित या नाट्यप्रयोगांनी सध्या रसिकांच्या आणि राजकीय विश्लेषकांच्या मनात विशेष उत्सुकता निर्माण केली आहे.

![]()




