जळगाव समाचार | २० मार्च २०२६
बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात यांच्याशी संबंधित वाद तीव्र झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकर यांनी राजीनामा सुपूर्द केला. या घटनेमुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधत संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या विरोधात खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या गेल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठीच आपण पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाकणकर यांनी सांगितले की, शिवलिका संस्थानाशी त्यांचा संबंध हा केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्यापुरता मर्यादित होता. त्या संस्थेच्या ट्रस्टवर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती कार्यरत होत्या आणि ८ ऑगस्ट २०२५ रोजी त्या ट्रस्टचा कार्यकाळ संपला होता. अशोक खरात यांना आपण ‘गुरू’ मानत असल्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कथित गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही घटना समजल्यानंतर आपण हादरलो असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी आपण सुरुवातीपासूनच केली असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. त्यांनी पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. आपल्या कुटुंबाची वारकरी परंपरा असून श्रद्धेपोटी या संस्थेशी संबंध जोडला गेला होता, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
चाकणकर यांनी माध्यमांमधील काही बातम्यांवरही आक्षेप घेतला. १९ मार्च २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्ताबाबत त्यांनी खुलासा करत, आयोगाने संबंधितांकडून माहिती मागवण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. तसेच, ५ मार्च रोजी प्राप्त झालेल्या एका तक्रारीच्या आधारे तत्काळ पोलिसांना पत्र पाठवून कारवाईचे निर्देश दिले होते. त्या तक्रारीत अशोक खरात यांचे नाव नव्हते, तर त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणाविरोधात आरोप होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांपासून चुकीची माहिती आणि बनावट संदर्भ वापरून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सुषमा अंधारे आणि इतर संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचे जाहीर केले. काही छायाचित्रे चुकीच्या तारखांसह प्रसारित करण्यात आल्याचे सांगत, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराचा निषेध त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अशोक खरात दोषी असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. एखाद्या व्यक्तीचे भविष्यातील वर्तन कसे असेल, हे पूर्वी सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे, या उद्देशानेच आपण पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात पुढील निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, लवकरच सविस्तर पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

![]()




