जळगाव समाचार | १६ ऑगस्ट २०२६
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळे तसेच चार्टर्ड अकाउंटंट आर. डी. जैन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या अध्यक्षा रोजमिन खिमानी प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सादरीकरणांतून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्याविषयीची स्वप्ने प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि देशप्रेम या मूल्यांची जडणघडण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या मूल्यांच्या बळावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा केला.

![]()





