जळगाव समाचार | १५ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील साई गजानन रेसिडेन्सी या बहुमजली अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये शनिवारी पहाटे सुमारे दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागून तब्बल १८ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद झाला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
साई गजानन रेसिडेन्सीमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास असून तळमजल्यावर वाहन पार्किंगची व्यवस्था आहे. रहिवाशांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपापल्या दुचाकी पार्किंगमध्ये उभ्या केल्या होत्या. शनिवारी पहाटे अचानक पार्किंग परिसरातून धूर व आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. पहिल्या मजल्यावरील एक रहिवासी गॅलरीत आल्यानंतर त्याच्या निदर्शनास खाली पेटलेली आग आली. त्याने तत्काळ आरडाओरडा करून इमारतीतील इतरांना सावध केले. काही क्षणांतच रहिवासी खाली धावले व पाण्याच्या पंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र दुचाकींच्या पेट्रोल टाक्यांमध्ये स्फोट होऊ लागल्याने आग अधिकच भडकली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरल्याने काही कुटुंबांनी सुरक्षिततेसाठी बाहेर पडणे पसंत केले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने सुमारे अर्धा ते एक तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या कारवाईत वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, यश मनोरे, चेतन सपकाळे, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे आणि भावेश मराठे यांनी धाडसाने काम करत आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरण्यापासून रोखली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
या आगीत आत्माराम जाधव, शिरीष सोनवणे, अजय कापुरे, सुरेश सोनवणे, शरद बोरसे, ललित बेडीस, ज्योती पवार, राजेश खडके, भारत तामनेरकर, किरण पाटील, सुधीर पाटील, मनोज मोरे आणि धोंडू बडगुजर यांची प्रत्येकी एक दुचाकी जळून खाक झाली, तर सागर पाटील आणि संग्राम विसपुते यांच्या प्रत्येकी दोन दुचाकींचे नुकसान झाले. एकूण १८ दुचाकी पूर्णतः जळाल्याने संबंधितांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग नैसर्गिक कारणाने लागली की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली, याबाबत संशय व्यक्त होत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

![]()




