जळगाव समाचार | २६ नोव्हेंबर २०२५
“मलाही कलेत रस आहे… जे पोटात आहे तेच ओठात, मनात आहे तेच चेहऱ्यावर दिसतं, म्हणून कदाचित मी या क्षेत्रात पुढे काही करू शकलो नाही. पण आज तुमच्या माध्यमातून ही आवड पुन्हा जोपासली जात असल्याचा आनंद मोठा आहे,” अशा भावना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मांडल्या. जिल्ह्यात रुजू होताच कलावंतांच्या नाट्यगृहासंदर्भातील समस्या त्यांनी ऐकून घेतल्या असून, प्रशासन सदैव कलावंतांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील हौशी नाट्य कलावंतांना दरवर्षी व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीची ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार असून, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी घुगे यांच्या हस्ते नटराजपूजन, श्रीफळ वाढवून आणि नाट्यपरंपरेनुसार घंटानाद करून झाले. उद्घाटनावेळी चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विनोद ढगे, बालरंगभूमी परिषदेचे प्रभारी कार्यवाह योगेश शुक्ल, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या डॉ. शमा सराफ, हास्यजत्रा फेम हेमंत पाटील तसेच झी५च्या ‘बाई तुझ्या पायी’ फेम अनिल मोरे आणि चेतन कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील रंगकर्मींच्या कार्याचे कौतुक करत जळगावातील जैन उद्योग समूहाचेही विशेष आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने नाट्यस्पर्धेला भक्कम पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार नितीन तायडे यांनी मानले. उद्घाटनानंतर स्पर्धेच्या विविध कलाप्रकारांची रंगतदार मैफल जळगावकरांसमोर खुलणार असल्याने रंगभूमीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर यांचे ‘दानव’ हे गूढ नाटक. लेखक अतुल साळवे आणि दिग्दर्शक प्रवीण मोरे यांनी साकारलेल्या या नाटकाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना ताणात ठेवले. भयानक जंगलातील मोडकळीस आलेल्या घरात अडकलेल्या दोन प्रवाशांभोवती गुंफलेली कथा मानवी स्वभावातील दुष्ट प्रवृत्ती, संघर्ष आणि सत्याचे टोकदार दर्शन घडवते. चांडाली आणि भैरव या पात्रांच्या मानसिक संघर्षाला दिशा देत अखेरीस चांडाली ही पोलीस अधिकारी असल्याचा उलगडा रंगमंचावर प्रभावीपणे उभा राहिला.
नाटकाच्या तांत्रिक बाजूही तितक्याच ताकदीने खुलल्या. अतुल ब-हाटे यांच्या प्रकाशयोजनेने गुढतेचे वातावरण निर्माण केले तर मोहित कांबळे यांच्या पार्श्वसंगीताने प्रसंगांची भेदकता वाढवली. रोशन वाघ यांनी उभे केलेले नेपथ्य नाटकाचा गाभा ठरला. काजल वाघ आणि ज्योती चंद्रमोरे यांनी केलेली वेशभूषा आणि रंगभूषा नाट्यप्रवाहाशी समरस होणारी होती. प्रवीण मोरे, ऐश्वर्या खोसे, शुभम गुडा, सपना तिवारी, रोशन वाघ आणि महेश होनमाने यांच्या अभिनयाने ‘दानव’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात प्रभावी रंगमंचीय अनुभवाने झाली.

![]()




