जळगाव समाचार | ३ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील शिवतीर्थ जी.एस. ग्राउंड येथे सुरू असलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाला जळगावकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली येथील फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यावेळी मंचावर आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, श्रीमती केतकी पाटील (गोदावरी फाउंडेशन), डॉ. प्रीती अग्रवाल (रायसोनी कॉलेज), श्री. सुहास गाजरे (शासकीय अभियांत्रिकी कॉलेज), श्री. गोकुळ महाजन (पोदार इंटरनॅशनल स्कूल), एम. झेड. सरवर (ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव), माजी महापौर सीमाताई भोळे, रणधीर सोमवंशी, राजेंद्र लोखंडे, डॉ. रितेश पाटील, अखिला श्रीनिवासन आणि दत्ता थोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र गीताने’ भावपूर्ण वातावरणात झाली.
यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या मनोगतात म्हटलं,
“गेल्या तीन दशकांपासून रखडलेले पाडळसरे धरणाचे स्वप्न आता साकार होत आहे. या धरणासाठी तब्बल ८५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, नव्याने साकार झालेलं जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे ठरले असून, लवकरच त्याला कार्गो विमानतळाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ हे केवळ एक प्रदर्शन नाही, तर शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारा संवाद आहे. विकासाचा प्रवास जळगावपासूनच सुरू होत आहे.”
या प्रसंगी आमदार सुरेश (राजू मामा) भोळे म्हणाले, “खा. स्मिताताई वाघ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कल्पकतेतून साकारलेले हे प्रदर्शन म्हणजे विकासाचा आराखडा आहे. कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगती इथे एका ठिकाणी पाहायला मिळते. बांबूची भाजी खाता येते, हे मला इथेच पहिल्यांदा कळाले!” असे ते हसत म्हणाले.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल साडेपाच हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध विभागांच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाविषयी माहिती घेतली. या वेळी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पिपल बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महिला आघाडी प्रमुख सरिता माळी, जे.डी.सी.सी. बँकेचे संचालक जितेंद्र देशमुख, तसेच विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनातील सर्वांत मोठे आकर्षण ठरले जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या स्टॉलवरील तब्बल एक लाख वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अंडे. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने ते पाहिले आणि वैज्ञानिकांकडून त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीचा स्टॉलही चर्चेचा विषय ठरला. येथे युद्धात वापरल्या जाणाऱ्या देशी बनावटीच्या बॉम्ब आणि बुलेटच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या असून, या प्रतिकृतींनी उपस्थित प्रेक्षकांना युद्धभूमीचा थरारक अनुभव दिला.
प्रदर्शनात ५० हून अधिक केंद्रीय व राज्यस्तरीय विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये जैवतंत्रज्ञान विभाग, केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वीज उत्पादन कंपनी, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय चहा मंडळ, पंजाब नॅशनल बँक, मध्य रेल्वे, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), तसेच महाराष्ट्र बांस विकास संस्था यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले, सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार प्रदर्शन अखिला श्रीनिवासन यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी, साक्षी रावत, हिमांशी महावर, तानिक्षा शुक्ला, आकांक्षा झा आणि महालक्ष्मी यांनी विशेष परिश्रम घेतले.

![]()




