जळगाव समाचार | १९ ऑक्टोबर २०२५
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सुमारे ४ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या दूरक्षेत्र पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रावर उभी राहिलेल्या या आधुनिक इमारतीत १४ प्रशस्त दालने, लिफ्ट, सौरऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वातानुकुलित कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, पाळधी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय पाटील, उद्योजक दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाषण केले. “ज्या पोलिस ठाण्याच्या जेलमध्ये मी आंदोलने करून अनेकदा जात असे, त्याच ठाण्याची इमारत आता माझ्या हस्ते उभारली जाते आहे, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “बाहेर कुठेही बोलताना अडचण येत नाही, पण स्वतःच्या गावात बोलताना गळा दाटून येतो. कारण पाळधी गावानेच मला लहानाचे मोठे केले, घडवले आणि राजकारणात स्थान दिले.”
गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा धावता आढावा घेत सांगितले की, १९८४-८५ मध्ये पाळधी गावातच शिवसेनेची शाखा सुरू करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांना पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या तडाखेबाज भाषणशैलीमुळे त्यांना “खान्देशची मुलुख मैदान तोफ” अशी ओळख मिळाली. १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून ते आजतागायत सातत्याने जनतेच्या विश्वासाने कार्यरत आहेत. अनेक आंदोलने, कारावास आणि संघर्षांमधून पुढे येत आपल्या गावात उभे राहिलेले हे पोलिस ठाणे त्यांच्या कारकिर्दीतील स्मरणीय टप्पा ठरले आहे.

![]()




