जळगाव समाचार | १५ डिसेंबर २०२५
पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रांचे वितरण करत असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका बुरखाधारी महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वतःच्या हाताने खाली सरकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात तीव्र खळबळ उडाली असून, मुख्यमंत्र्यांच्या वर्तनावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात, तेही महिलांच्या बाबतीत, असे कृत्य केल्याने नितीश कुमार यांच्यावर तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
या व्हायरल व्हिडिओवरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) थेट नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “नितीश कुमारांना नेमकं काय झालं आहे? त्यांची मानसिक अवस्था ढासळली आहे की ते १०० टक्के संघी झाले आहेत?” असा सवाल उपस्थित करत राजदने संताप व्यक्त केला आहे. राजदचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी फेसबुक पोस्टद्वारे महिलांचा सन्मान करणं नितीश कुमार यांना जमत नसल्याचा आरोप केला असून, या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://x.com/RJDforIndia/status/2000524616217837735?s=20
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही या प्रकाराचा कडाडून निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “बिहारच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने जाहीरपणे महिला डॉक्टरचा हिजाब ओढणं हे निर्लज्ज आणि माफ न करण्यासारखं कृत्य आहे. यावरून राज्यातील महिलांची सुरक्षितता किती धोक्यात आहे, हे स्पष्ट होतं,” असा आरोप काँग्रेसने केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भाजप-एनडीएच्या विजयामुळे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितीश कुमार यांच्यासाठी हा व्हिडिओ सध्या मोठं राजकीय संकट ठरत असल्याचं चित्र बिहारमध्ये दिसून येत आहे.

![]()




