अखेर तालुका पोलिस ठाण्याला मिळाले पूर्णवेळ निरीक्षक शशिकांत पाटील शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून राज्यात ओळख; पाच महिन्यांत तिसरी बदली

 

जळगाव समाचार | २६ ऑक्टोबर २०२५

जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी (२५ ऑक्टोबर) जारी केले.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पद रिक्त होते. तालुका हद्दीत उघडकीस आलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणानंतर, तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची ६ ऑक्टोबर रोजी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर हा कारभार सपोनि अनंत अहिरे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला होता. मात्र, प्रभारी निरीक्षकपद अधिकृतरीत्या रिक्तच होते.

दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत पाटील यांची बदली आता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजासोबतच गुन्हे तपास आणि कायदा-सुव्यवस्थेच्या गतीला नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बोगस कॉल सेंटर प्रकरणाची पार्श्वभूमी
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रोडवरील फार्महाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद उपकरणे आणि डेटा जप्त करण्यात आला होता. हे कॉल सेंटर जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असल्याने, त्या ठिकाणच्या पोलिस यंत्रणेवर ठपका ठेवण्यात आला आणि परिणामी तत्कालीन निरीक्षक संजय गायकवाड यांची बदली करण्यात आली होती.

शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख

पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील हे शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून राज्य पोलिस दलात ओळखले जातात. त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधीक्षक कार्यालयात अडीच वर्षे सेवा बजावली आहे. तसेच त्यांनी नागपूर येथे नार्कोटिक्स आणि क्राईम ब्रँच, तसेच गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण पोलिस ठाण्यांमध्येही यशस्वी कारकीर्द गाजवली आहे.

स्थानिक आव्हाने आणि अपेक्षा

जळगाव तालुका पोलिस ठाण्याची हद्द ही विविध गुन्हेगारी प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे नव्याने आलेल्या प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासमोर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here