जळगाव समाचार डेस्क | ५ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज देशातील दोन बडे नेते महाराष्ट्रात येणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
राहुल गांधी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते कसबा-बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर ते ‘संविधान सन्मान’ या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे, काल त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आला होता, मात्र आजचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा मुंबई व वाशिम दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मेट्रो-3 प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत. तसंच, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथेही मोदींचा दौरा होणार असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. या योजनेमुळे देशभरातील सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांचा लाभ होईल.
याशिवाय, मोदींच्या हस्ते 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटनही होणार आहे. कृषी व पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी 23,300 कोटी रुपयांचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये देशी गायीच्या संगोपणासाठी ‘युनिफाइड जीनोमिक चिप’ हे नवीन तंत्रज्ञान लॉन्च होणार आहे, ज्यामुळे उच्च प्रतिच्या कालवडींचा जन्म होण्यास मदत होईल. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचं प्रतीक असलेल्या ‘बंजारा विरासत संग्रहालयाचं’ही उद्घाटन होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात होणारे हे दोन्ही दौरे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत.