जळगाव समाचार | १ जून २०२६
राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी उशिरा आपल्या ११ उमेदवारांची घोषणा केली. महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला ११, शिवसेना (शिंदे गट) ला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २ जागा देण्यात आल्याचे समजते.
उमेदवार निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दुपारनंतर नवी दिल्ली येथे दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आणि रात्री उशिरा यादी जाहीर करण्यात आली.
या यादीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले नाव म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तनपुरे यांना अहिल्यानगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम यांना संधी देण्यात आली असून सोलापूर मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमर राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पक्षाने त्यांना संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर सामावून घेतल्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार, अहिल्यानगरसाठी प्राजक्त तनपुरे, धाराशिव-लातूर-बीडसाठी बसवराज पाटील, जळगावसाठी नंदकिशोर महाजन, सोलापूरसाठी राजेंद्र राऊत, नांदेडसाठी अमर राजूरकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरसाठी अरुण लखाणी, भंडारा-गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, सांगली-साताऱ्यासाठी धैर्यशील कदम तसेच छत्रपती संभाजीनगर-जालन्यासाठी सुहास शिरसाट यांचा समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा झाल्याने संबंधित मतदारसंघांतील राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती आणि विरोधकांमधील निवडणूक लढतीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
![]()






