जळगाव समाचार | ११ डिसेंबर २०२५
शहरातील औद्योगिक वसाहतीत गेल्या महिन्यात केमिकल कंपनीला लागलेल्या आगीतून धडा न मिळताच, बुधवारी रात्री पुन्हा ठिबक निर्मितीच्या साई किसान कारखान्यात भीषण आग लागली. सुमारे साडेनऊच्या सुमारास उद्भवलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचा ठिबक नळ्यांचा साठा जळून खाक झाला. आगीच्या वेळी आतमध्ये २० ते २५ कामगार काम करत होते; मात्र आग लागल्याचा आवाज होताच त्यांनी वेळेवर बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सामग्री असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. कारखान्याचे मालक जगन्नाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगतच्या ट्रान्सफार्मरची महावितरणकडून मंगळवारीच दुरुस्ती झाली होती आणि तुटलेले कटआउटही बदलण्यात आले होते. तरीही बुधवारी रात्री शॉर्ट सर्किट होऊन आग भडकली. घटनेनंतर महावितरणने परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद केला.
आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिका, भुसावळ, वरणगाव आणि नशिराबाद नगर परिषदांचे एकूण सहा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास मध्यरात्रीपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व परिस्थितीची पाहणी केली.
औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटना वाढत असल्याचे वास्तव या आगीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. नोव्हेंबरमध्ये आर्यवर्त केमिकल कंपनीला लागलेल्या आगीसह मागील वर्षी मोरया ग्लोबल लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे कामगार सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुन्हा जोर धरत असून, आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

![]()




