जळगाव समाचार | २ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाबाबत सर्वांचे लक्ष लागून होते. यंदा महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला राखीव असल्याने इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली होती. अखेर महायुतीने या पदांसाठी नावांची घोषणा करत उत्सुकतेचा शेवट केला. मंत्री गिरीश महाजन यांनी आज अधिकृतपणे भाजपच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या दिपमाला काळे यांच्या नावावर महापौरपदाची मोहोर उमटवली. तर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १३ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली.
अलीकडेच पार पडलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपला ४६, शिवसेनेला २२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली होती. एका जागेवर अपक्ष तर पाच जागांवर शिवसेना-उबाठा पक्षाने विजय मिळवला होता. निकालानंतर महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उज्वला बेंडाळे, दिपमाला काळे आणि वैशाली पाटील यांच्यात स्पर्धा असल्याचे चित्र होते.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून दिपमाला मनोज काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांची महापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेतर्फे मनोज सुरेश चौधरी यांना उपमहापौरपदासाठी संधी देण्यात आली असून त्यांची निवडही बिनविरोध होणार आहे. विशेष म्हणजे महापौर व उपमहापौरपदी विराजमान होणारे दोन्ही नगरसेवक हे याआधीही बिनविरोध निवडून आलेले आहेत.
नावे जाहीर करताना मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे तसेच महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()




