महापौरांकडून पाणी अपव्यय रोखण्यासह गटारींची स्वच्छता आणि अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याचे आदेश


जळगाव समाचार | १९ ऑक्टोबर २०२६

महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सोमवारी प्रभाग क्रमांक ४ मध्ये महापौर दीपमाला काळे यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अनधिकृत अतिक्रमणांची पाहणी केली. बालाजी मंदिरासमोरील बंद घराच्या नळजोडणीतून पाणी वाया जात असल्याचे, तर गंगा कावेरी निवास येथे नळांना तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत संबंधित ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

पाहणीदरम्यान प्रभागातील कचरा साचलेल्या आणि तुटलेल्या गटारींची दखल घेत त्या तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील उघड्या गटारींच्या स्वच्छतेसह आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम व आरोग्य विभागाला देण्यात आल्या. तसेच पुलाजवळील शौचालय परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर प्रतिबंध घालून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. स्वच्छता निरीक्षक डाबोरे यांनी या कामासाठी ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

शनिपेठेतील सोनवणे विद्यालयासमोरील परिसरात चिकन विक्रेत्यांनी उभारलेले शेड तसेच कुंभार गल्लीतील विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले साहित्य यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहणीत आढळले. संबंधित विक्रेत्यांचे परवाने तपासून अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याचे, तसेच कुंभार गल्लीतील विनावापर पडून असलेली पानटपरी हटविण्याचे आदेश महापौरांनी दिले. या दौऱ्यात नगरसेवक विद्या सोनवणे, कल्पेश सोनवणे, शशीबाई ढंडोरे, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here