जळगाव समाचार डेस्क| ५ सप्टेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले. आपटेच्या अटकेसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या पथकाने आपटेला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरून कोसळला होता. या घटनेनंतर मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चेतन पाटीलला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर जयदीप आपटे फरार होता.
सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या अटकेसाठी सात पथकांची रचना केली होती. कल्याण पोलिसांच्या कारवाईत त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे याला अटक करून सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, आणि त्याला सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जयदीप आपटेच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. “जयदीप आपटे स्वतः समोर आला की पोलिसांनी तोपर्यंत त्याचा शोध घेऊ शकला नाही, याबाबत संशय आहे. त्याला मिळालेल्या वरदहस्तामुळेच त्याचा शोध घेण्यात विलंब झाला का?” असा सवाल सावंत यांनी विचारला आहे.

![]()




