खाऊ गल्लीतील अस्वच्छतेवर महापौरांचा संताप; दंडात्मक कारवाईचे निर्देश

 

‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत प्रभाग ५ मध्ये पाहणी; गोलानी मार्केटमधील फुलांचा लिलाव अन्यत्र हलवण्याच्या सूचना

जळगाव समाचार | २१ ऑक्टोबर २०२६

शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी विविध ठिकाणी साचलेला कचरा, अस्वच्छ गटारी आणि उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कचऱ्याचे स्पॉट तातडीने हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश देतानाच, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पाहणीदरम्यान जैन मंदिराची गल्ली, नवजीवन शॉप तसेच अदिती साडीजच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचे आढळले. या अस्वच्छतेबाबत महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांकडे विचारणा करून संबंधित ठिकाणे तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. प्रभागातील कचरा साचणाऱ्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करून नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.

खाऊ गल्लीतील अस्वच्छता हटवण्याचे आदेश

महापालिका इमारतीखालील खाऊ गल्ली परिसरातही अस्वच्छता आढळून आली. हा परिसर स्वच्छ करून तेथील जागा रिकामी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. परिसरातील फुलविक्रेत्यांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित विक्रेत्यांना जाब विचारला. प्रत्येक दुकानासमोर मोठ्या कचराकुंड्या ठेवाव्यात आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. उघड्यावर कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

फुलांचा लिलाव अन्यत्र हलवण्याची सूचना

गोलानी मार्केटमध्ये फुलांच्या लिलावामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असल्याची बाब पाहणीदरम्यान समोर आली. त्यामुळे गोलानी मार्केटमधील फुलांचा लिलाव अन्य योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे बाजारपेठेतील स्वच्छता राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पाहणीच्या वेळी काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत असल्याचेही निदर्शनास आले. पाणी वाया घालवणाऱ्या संबंधित नागरिकांवर पाणीपुरवठा विभागाने दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेविका मंगला चौधरी, आशा पाटील, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता जितेंद्र रंधे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here