जळगाव समाचार | १३ नोव्हेंबर २०२५
जळगावचे माजी महापौर आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते ललित कोल्हे गेल्या महिनाभरापासून नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्महाऊसवर चालविण्यात आलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात कोल्हे यांच्यासह आठ जणांविरोधात संघटित गुन्हेगारी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी एल.के. फार्महाऊसवर छापा टाकला असता, ३१ लॅपटॉप आणि अत्याधुनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. प्राथमिक तपासात हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
या प्रकरणात तपासादरम्यान दोन लॅपटॉपवर आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले असून, संशयितांचे परदेशातील साथीदार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात इंटरपोलच्या मदतीने आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेणे बाकी असल्याचे नमूद केले. तसेच, या प्रकरणाचा तपास अजून प्रारंभीच्या टप्प्यात असल्याने कोणत्याही संशयितास सध्या जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे मत आहे.
दरम्यान, मुलाच्या लग्नासाठी अंतरिम जामीन मिळावा, असा अर्ज ललित कोल्हे यांनी न्यायालयात सादर केला. मात्र, सरकार पक्षातर्फे सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता संगिता ढगे यांनी या अर्जास तीव्र विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले की, गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असून, संबंधितांवर मोक्का अंतर्गतही कलम लागू आहे. याशिवाय, कोल्हे यांच्याविरोधात पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करणे योग्य ठरणार नाही. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हे यांना जळगाव कारागृहात हलविण्याचा निर्णय झाला होता; मात्र जागेअभावी त्यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले असून ते तेथूनच न्यायालयीन कार्यवाहीस सामोरे जात आहेत.

![]()




