महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर ललित कोल्हे जळगावात; न्यायालयाची परवानगी…

 

जळगाव समाचार | २६ डिसेंबर २०२५

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना निवडणूक प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी जळगाव कारागृहात आणण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे.

बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेले ललित कोल्हे हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज भरणे तसेच संबंधित कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांना जळगाव कारागृहात ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत दि. २९ डिसेंबर ते दि. ३ जानेवारी या कालावधीत त्यांना जळगाव कारागृहात ठेवण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, बोगस कॉल सेंटर प्रकरणात दाखल केलेला त्यांचा जामीन अर्ज खालच्या न्यायालयाने फेटाळला असून, त्या निर्णयाविरोधात ते आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यामुळे कोल्हे यांना निवडणुकीपूर्वी जामीन मंजूर होतो की ते कारागृहातूनच निवडणूक लढवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here