जळगाव समाचार | १४ नोव्हेंबर २०२५
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील अंतरिम जामीन अर्जाला न्यायालयाने नकार दिला आहे. परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे हे कॉल सेंटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एल. के. फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. कारवाईत ३१ लॅपटॉपसह अत्याधुनिक उपकरणे जप्त झाली. दोन लॅपटॉपमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा कोन स्पष्ट झाला आहे. या प्रकरणात कोल्हेसह आठ जणांवर गुन्हा दाखल असून ते नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत.
कोल्हे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला मुलाचे लग्न असल्याने १५ दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, सरकार पक्षाच्या अभियोक्ता संगीता ढगे यांनी या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय स्वरूप, लागू असलेली संघटित गुन्हेगारीची कठोर कलमे आणि कोल्हे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याचा दाखला देत जामिनास विरोध दर्शविला. तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयात, रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात असल्याचे सांगितले.
दोन्ही बाजूंची मते ऐकून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. तपासाची दिशा लक्षात घेता संशयितांना सध्या मोकळेपणाने सोडणे तपासात अडथळा ठरू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. जळगाव कारागृहात जागा नसल्याने कोल्हे यांना थेट नाशिक कारागृहात ठेवण्यात आले असून, गुन्ह्याशी संबंधित ठोस पुरावे मिळण्याच्या दृष्टीने पुढील तपास वेगाने सुरू आहे.

![]()




