जळगाव समाचार | २४ एप्रिल २०२६
ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊस येथे उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरिता माळी-कोल्हे यांनी दिली. दीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेल्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकून तेथे बेकायदेशीर कॉल सेंटर चालविले जात असल्याचा पर्दाफाश केला होता. या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. या कारवाईदरम्यान ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार संशयितांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासाधिकारी उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी न्यायालयात हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे नमूद करत पोलिसांची बाजू मांडली होती.
अटकेनंतर ललित कोल्हे यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून अखेर त्यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे कोल्हे लवकरच कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

![]()




