जळगाव समाचार | २७ जानेवारी २०२६
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींमुळे जळगाव जिल्ह्यात आज तीव्र असंतोष उफाळून आला. अनेक महिने उलटूनही आणि सर्व आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेकडो महिलांनी थेट जळगाव येथील महिला व बाल विकास कल्याण कार्यालयात जाऊन आक्रमक आंदोलन केले. “आमचे पैसे कुठे आहेत? तात्काळ पैसे द्या,” अशा घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे १० लाख ५० हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र प्रशासकीय व तांत्रिक अडथळ्यांमुळे १ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. अनेक महिलांनी बँका, सेतू कार्यालये आणि संबंधित विभागांचे उंबरठे झिजवले असून, वारंवार KYC प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. सणासुदीच्या काळात व घरखर्चासाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंदोलनानंतर प्रशासनाने महिलांशी चर्चा करत परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड व बँक खात्यावरील नावातील तफावत, आधार–बँक लिंक नसणे, आधार सीडिंगमधील तांत्रिक चुका यांमुळे निधी वर्ग करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर सर्व त्रुटी दूर करून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

![]()




